सहजच झाडून घेत असताना कॅलेंडरवर नजर गेली. असे तर कधी कॅलेंडर पाहिले नाही जात फक्त महिना बदलायला म्हणून हातात घेतले जाते. शोशल मीडियामुळे बिचाऱ्याकडे थोडे दुर्लक्ष होते. पाहिले तर दिसले गुढीपाडवा येतोय ३ दिवसांवर आणि लक्ष्यात आले मराठी नवीन वर्ष म्हणजेच चैत्र महिना गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते. झाडून घेत घेत विचारचक्र सुरू झाले खरच मला सगळी माहिती आहे का? गुढीपाडवा म्हणजे काय ? का साजरा केला जातो? त्याचे काय महत्त्व आहे ? मग ठरवले काम लवकर आवरायचं आणि जमेल तशी माहिती जमा करायची आणि लिहून काढायची.

गुढीपाडवा आणि त्याची पार्श्वभूमी
भरपूर वाचन केले आणि माहिती जमा केली ती अशी की हिंदू पंचांगानुसार मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी होते. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.
मराठा डायरी मध्ये आपले स्वागत आहे
या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. बऱ्याच अशा कथा पण मला वाचायला मिळाल्या खरच हे सगळे आपल्या माहीत असायला हवे जसे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस.

गुढीपाडव्याचे पौराणिक महत्त्व
ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली. आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासुर नावाचा दैत्य सागरापासून उत्पन्न झालेला. आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले.
भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.

गुढीपाडव्याचे महत्त्व
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतु पण सुरू होतोत्यामुळे वातावरणात बदल होतात. झाडाची जुनी पाने जी सुकलेली असतात ती आपोआप गळून पडतात आणि नवी पालवी फुटते. ह्याच काळात आंब्याला पण मोहोर येतो कदाचित या नैसर्गिक बदलाचे स्वागत म्हणून आपण गुढीला आंब्याची डहाळी बांधतो. तसेच ह्या वातावरणात वाढलेल्या उन्हाची दाह कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने पण लावतात.
गुढी कशी उभारावी?
गुढी उभारण्याची परंपरा खासकरून गुढीपाडव्याच्या दिवशी साजरी केली जाते आणि ती एक शुभ प्रतीक मानले जाते. गुढी उभारण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे पद्धत अवलंबू शकता:
- काठी कशी तयार करावी: एक स्वच्छ, लांब काठी (काठीच्या लांबीवर तुमची मोकळी जागा अवलंबून आहे) निवडा.
- कपडा बांधा: रेशमी किंवा साजरा कपडा (पारंपरिक पद्धतीने केशरी किंवा पिवळा) काठीवर बांधा.
- साखरेची माळ: साखरेच्या गाठी (साखरखडी) किंवा गोड पदार्थांची माळ कपड्याभोवती
- कडुलिंब व फुलं: कडुलिंबाच्या पानांचा छोटा गुच्छ तयार करून गुढीसोबत ठेवा. तसेच फुलांचा वापर सजावटीसाठी करा.
- पीतांबर: काही ठिकाणी काठीच्या टोकाला पीतांबर देखील बांधला जातो.
- मांडी (घरोबा): गुढी एखाद्या उंच जागी, उंच मांडीवर किंवा घराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवा.
- पितळी कलश: काठीच्या टोकाला पितळी कलश लावून गुढी तयार होते.
गुढी उभारल्यानंतर तिच्या समोर दीपप्रज्वलन करा आणि पूजा करून कुटुंबासह या परंपरेचा आनंद घ्या. गुढी उभारणे ही सणाची शुभता आणि आनंद दर्शवण्याची परंपरा आहे
अगदी सायंटिफिक विचार करायचा झाला तर प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात त्यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणे, त्वचारोग बरं करणे शक्य होते. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित केल्या जातात.
गुढी पाडवा हा केवळ एक सण नाही, तो पौराणिक कथा, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे एक सुंदर मिश्रण आहे, जे नवीन सुरुवात, विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पवित्र गुढी उभारण्यापासून ते उत्सवाच्या स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यापर्यंत, प्रत्येक विधीमध्ये खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. भगवान ब्रह्माच्या निर्मितीचा सन्मान असो, भगवान रामाचा विजय साजरा असो किंवा नवीन हिंदू वर्षाची सुरुवात असो, हा शुभ दिवस सकारात्मकता, यश आणि दैवी आशीर्वाद घेऊन येतो.
चला तर मग आपण चांगला असा संकल्प करुयात आणि नवीन मराठी वर्षाची सुरवात करूयात.
Comments